श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.
श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.

"केवढा उंच आणि मोठा हा गड !" पाली गावात प्रवेश करतांना सरसगड किल्ल्याचे प्रथमच ज्यावेळी दर्शन होते; त्यावेळी ढालाईताप्रमाणे उभ्या असलेल्या या गडाकडे पाहून सहज हे उद्गार बाहेर पडतात. पाली गावाच्या पूर्वेस दक्षिणोत्तर सरसगड किल्ल्याची अजस्त्र भिंत उभी आहे. किंबहूना सरसगड किल्ल्याचे उताराकडील सखल भागावर पाली हे गाव वसलेले आहे. पाली गावातून ह्या किल्ल्याची उंची पाहिली म्हणजे या गडावर आपणास कसे चढता येईल असा प्रश्न पडेल. परंतु प्रस्तारोहणाला सावकाशपणे सुरुवात केली तरी १ तासात सरसगड किल्ला सहजपणे सर करता येतो!

गडकिल्ल्याचा इतिहास म्हणजे युद्धाच्या कथा. पूर्वी गडकोटांना फार महत्व होते. ज्या राजाकडे किल्ले अधिक तो जास्त श्रीमंत. म्हणूनच २० ते २५ कि.मी. चे परिसरात मध्यवर्ती ठिकाणी एवढ्या उंचीच्या गडाचा उपयोग टेहळणीचा किल्ला म्हणून करता येईल, याकडे शिवरायांचे लक्ष गेले आणि त्यांनी सरसगड किल्ल्याला स्वराज्यात दाखल करुन घेतले. किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी २००० होन शिवाजीमहाराजांनी मंजूर केले व किल्ल्यास डागडुजी करुन लढाऊ बनविण्याचे फर्मान सोडले. यानुसार दुर्गमता व विपुल जलसंचय यावर विशेष भर देऊन सरसगडाची बांधणी करण्यात आली. दूरवर टेहळणी करण्यास व इशारा देण्यास 'सरस' म्हणून किल्ल्यास सरसगड नांव देण्यात आले. सरसगडाचा उल्लेख इतिहासात फारसा लिहिला गेला नाही. तथापि १४ व्या शतकात बहामनी सुभेदार अहमदशहाने कोकणातील स्वारीत या गडाचा पाडाव केला होता तर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी माधवराव लक्ष्मणराव रास्तेच्या मुलाला येथे ठेवले होते असा उल्लेख गॅझेटीयरमध्ये आहे. सरसगड किल्ल्याचाच भाग असलेला सलग दगडांचा एक जुळा किल्ला पाठीमागे अलगपणे उभा आहे. या भागास '३ कावडी' असे म्हणतात. सरसगड किल्ल्याचे सभोवती फार वर्षापूर्वी दाट जंगल होते. याच किल्ल्याचे दक्षिणेकडील बाजूचे जंगलामध्ये कृतयुगात बल्लाळास श्रीगजाननाने दर्शन दिल्याची कथा आहे.

सरसगड किल्ल्याची उंची सुमारे ४५० मीटर आहे. किल्ल्यावर जाण्यास किल्ल्याच्या दक्षिणोत्तर दोन्ही बाजूंनी वाटा आहेत. किल्ल्याच्या अर्ध्या उंची वरुन पायऱ्या कोरण्यात आल्या आहेत. दक्षिण बाजूकडील १११ पायऱ्या सलग एकाच दगडामध्ये घडविलेल्या असून उंच व प्रशस्त आहेत. नैसर्गिकरित्या किल्ला भक्कम असला तरी चुना व घडीव दगडांचा उपयोग करुन किल्ल्याला बुरूज व तटबंदी करण्यात आली आहे. तोफा व बंदूकांचा वापर करण्यासाठी बुरुज व तटास अनेक जंग्या (छिद्रे) ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही बाजूंनी किल्ल्यात शिरणेसाठी प्रवेशद्वारे कोरलेली आहेत. दक्षिणेकडील दरवाजा "दिंडी दरवाजा" म्हणून ओळखला जातो. उत्तर बाजूने किल्ला चढून गेल्यावर प्रवेशद्वाराजवळ मोती हौद आहे. या हौदातील पाणी अतिशय थंड व स्वच्छ असून ते बारमाही उपलब्ध असते. या हौदाची खोली ३ मीटर आहे. अशा प्रकारचे १० मोठे हौद बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी खोदलेले आहेत. युद्धकालीन व्यवस्थेसाठी किल्ल्यावर घोड्याची पागा, धान्य कोठारे, शस्त्रागारे, कैदखाने, दारु कोठारे, देवळ्या खोदून बांधल्या आहेत. बैठकीच्या खोल्या बांधण्यात आल्या असून यामध्ये शिबंदी रहात असे. तर पहारेकऱ्यांसाठी देवड्या बांधल्या आहेत. किल्ल्याला दक्षिणोत्तर जाणारे भूयार बालेकिल्ल्याच्या खालीस बाजूस खोदलेले आहे. अशा प्रकारची प्रचंड खोदकामे पाहताना आश्चर्य वाटते आणि गडकिल्ले म्हणजे केवळ लढाया नाहीत, तर स्थापत्य, प्रशासन, सरंक्षणसिद्धता असेही पैलू त्याला होते हे जाणवते.

बाले किल्ल्यावर चढून गेल्यावर निसर्गाचे विलोभनीय दृश्य दिसते. गावे- वाड्या, नद्यांचे प्रवाह, शेती, डोंगर, गर्द झाडी आणि छोटी दिसणारी घरे, माणसे व वाहने पाहणे मजेशीर असते. बालेकिल्ल्यावरील जागेचे क्षेत्रफळ केवळ अर्धा हेक्टर आहे. या जागेत जोगेश्वरी (केदारेश्वर) मंदिर व त्याभोवती तळे आहे. याखेरीज शहापिर दर्गा आहे. वैशाख पौर्णिमेला दर्ग्याचा उरुस भरतो तर श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला केदारेश्वराला भाविकांची गर्दी असते. गिर्यारोहक व पर्यटकांचे लक्ष हा किल्ला नेहमीच आकर्षीत करुन घेत असतो. यामुळे तरुणांची कुतूहलापोटी किल्ल्यावर वर्दळ असते. गडावर फरसबंदी पायवाट आणि मंदिरे व पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती केल्यास गडावर अधिक लोक येऊ शकतील दरवर्षी स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकविला जातो. राष्ट्रीय एकतेचा संदेश देत सरसगड किल्ला समर्थपणे उभा आहे.