श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.
श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.

"गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजीना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे, गडकोट म्हणजे आपले सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणे प्राणसंरक्षक. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग", अशा तऱ्हेने गडाचे महत्व आज्ञापत्रामध्ये वर्णिलेले आहे. ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोटांचे संरक्षण करावे व नूतन बांधण्याचा हव्यास धरावा अशाही सूचना आज्ञापत्रामध्ये केल्या आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व पावलेल्या व अतिशय देखण्या असलेल्या सुधागड किल्ल्याचे बाबतीतही एकेकाळी उपरोक्त वर्णन जुळणारे होते. कारण सुधागड किल्ला हा भोर संस्थानाचे वैभव होता. किंबहुना सुधागड किल्ला म्हणजे भोर संस्थान अशी या किल्ल्याची ख्याती होती.

"सुधागड " हा फार प्राचीन किल्ला आहे. पुराणकाळात भृगुऋषींनी येथे वास्तव्य केले होते. येथील पवित्र व शांत परिसरात त्यांनी दीर्घकाळ तप:साधना सुधागड केली आणि श्री भोराई देवीची स्थापना करुन गोमाशी गावाकडे प्रयाण केले होते. सुधागड किल्ल्याला पूर्वी भोरपगड म्हणत असत. परंतु पुढे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या किल्ल्याला झाला आणि याचे: नाव ठेवले गेले. इ.स. १६४८ मध्ये नारो मुकुंद यांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला आणि सुधागड किल्ला शिवराज्यात दाखल झाला. या घटनेचा ऐतिहासिक कागदपत्रात आढळणारा उल्लेख असा -

“साखर दऱ्यात मालोजी नाईक यांनी माळ लाविली. सरकार मालोजी भोसले, जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यास उभ करुन त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जावून माथा गेले.........पंचवीसाने यापुढे गस्त मारीली. बोकडसीलेचा पहारा मारला. पुढे श्री भोराईच्या टप्प्यावरी गेले. तो सदरेतून किल्लेदार व सैन्य धावून आले. हाणाहाण झाली. ते समयी किल्लेदार कामास आले. उपरांतीक जावून सदर काबीज केली. "

नारो मुकुंद यांनी फार थोड्या सैन्यासह किल्ला ताब्यात घेतला होता. त्याला कारणही तसेच झाले होते. पावसाळा जवळ आल्याने किल्ल्यावरील मुघल सेनापतीने शाकारणीसाठी पेंढा व घोड्यांसाठी गवत खरेदीची शेजारच्या गावात दवंडी दिली होती. यानुसार जाधव, सरनाईक इत्यादिकांनी किल्ल्यावर पेंढ्यांची ओझी घेऊन जायचे ठरविले. पेंढ्यांचे ओझ्यात व गवताचे भान्यात तलवारी लपवून नेवून शत्रूवर दुसऱ्या बाजूने हल्ला करणेत आला आणि मोघलांकडून सुधागड किल्ला ताब्यात घेण्यात आला. यावेळी तुंबळ युद्ध झाले व त्यात किल्लेदारांसह सर्वांची कत्तल होऊन सुर्योदयाला किल्ल्यावर भगवे निशाण लागले. या लढाईत खंडागळे घराण्यातील वीर पुरुष कामी आले होते.

सुधागड किल्ला हस्तगत केल्यानंतर नारो मुकुंद यांनी छत्रपती शिवरायांकडे किल्ल्याची राजधानीसाठी शिफारस केली होती व खुद्द महाराजांनी त्याची पाहणी सुद्धा केली. परंतु सुधागडापेक्षा महाराजांस रायगड किल्ला जास्त मोक्याचे ठिकाणाचा वाटला. तथापि याचवेळी सुधागड किल्ल्याचे बांधकामासाठी महाराजांनी ५००० होन देवून किल्ल्यास लढावू बनविले. छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, अष्टप्रधान मंडळी व तत्कालीन अनेक नामांकित सरदार स्वराज्य रक्षणाकामी सुधागडावर येऊन गेले होते. औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यास या किल्ल्याचे पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर गावी संभाजी महाराजांनी आश्रय दिल्याची नोंद आहे. अकबर बादशहाने अनेक दिवस या गावाजवळ राहिल्याने या गावाचे नाव पादशहापूर व त्यानंतर पाच्छापूर असे झाले. अकबरामुळे संभाजी महाराजावरील विषप्रयोगाचे कारस्थान उघडकिस आले होते आणि या कारस्थानात सामिल असणाऱ्या काही सुभेदारांचा कडेलोट सुधागड किल्ल्यावरील टकमक टोकावरुन करण्यात आला होता. अन्य दोन अष्टप्रधानांना पेडली तिवरे गावाजवळ हत्तीच्या पायी देण्यात आले.

अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारा हा सुधागड किल्ला पाली या तालुक्याच्या मुख्य ठिकाणापासून १२ कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी धोंडसे, पाच्छापूर व दर्या या गावाकडून पायवाटा आहेत. किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा या दाट जंगलातून गेलेल्या आहेत. पाच्छापूर गावाकडून या गडावर चढण्यासाठी उभा चढ असल्याने दमछाक होते. तर दर्या ठाकूरवाडीकडून गडावर चढण्यासाठी एका ठिकाणी शिडीने चढावे लागते. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील तेलबैला या गावाकडूनही सवाष्णी घाटामार्गे गडावर येण्यासाठी मार्ग आहे. गडावर कोणत्याही वाटेने जरी गेले तरी अवघड वाटा व उभे चढ चढताना रानगंधात मिळणारा आनंद अवर्णनीय असतो !

सुधागड किल्ल्याची आकाशाला भिडणारी उंची, दुर्गम वाटा, घनदाट जंगल, किल्ल्यावरील विस्तृत पठार, भरपूर पाणी आणि चारही बाजूंनी अभेद्द असणाऱ्या या किल्ल्याची राजधानी करण्याकरिता शिफारस झाली होती आणि याच काळापासून हिंदवी स्वराज्य रक्षणात सुधागड किल्ल्याला महत्व प्राप्त होत गेले. औरंगजेबाबरोबर दख्खनच्या युद्धात पराक्रम गाजवून मराठी साम्राज्य रक्षणाचे काम केले, याबद्दल राजाराम महाराजांनी शंकराजी नारायण यांचा गौरव केला आणि त्यांना सचिवपद दिले. हेच ते भोर संस्थानचे पहिले सचिव व नारो मुकुंद यांचे पुत्र. यानंतर भोर संस्थानाचा कारभार कोल्हापूरचे छत्रपती महाराज यांचे अधिपत्याखाली चालत होता आणि या संस्थानामध्ये विचित्रगड (रोहिडा), राजगड, प्रचंडगड, मौनमावळ व सुधागड हे पाच तालुका होते. यापैकी सुधागड हा एकमेव तालुका कोकणातील होता.

ऐतिहासिक पाश्वभूमी असलेल्या सुधागड किल्ल्याची उंची सुमारे ६१९ मीटर आहे. किल्ल्याच्या तळाकडील घेर १५ कि.मी. आहे. गडावर जाणारी वाट हे धोंडसे गावातून जाते. दातपाडी नदी ओलांडल्यावर चढावाला सुरुवात होते. घनदाट जंगलातून चढून गेल्यानंतर डाव्या हातास पडके शिवमंदिर व कासारपेठ मारुती आहे. या ठिकाणी पूर्वी त्वष्टा-कासार समाजाची वस्ती होती. या भागातील जंगलामध्ये अशोक, हिरडा, निगुड, कारावी, साग, शिसव, ऐन, किंजळ, जांभूळ, बांबू, शिकेकाई, धावडा इ. अनेक जंगली व औषधी वनस्पती आहेत. आयुर्वेद शास्त्रातील महत्वपूर्ण वनस्पती येथे आहेत. 'कोंबडनखी' नावाची कोंबडीच्या नख्याप्रमाणे असणारी मुळी वातविकारादी रोगांवर उपयुक्त आहे. येथील जंगलामध्ये रात्रीच्या वेळी चमकणारे एक झाड 'संजिवनी' या नावाने ओळखले जाते. सुधागड किल्ल्यावर चढतांना मधल्या वाटेत थकलेल्या प्रवाशांची तहान भागविण्यासाठी "तानाजी टाके” नावाचे दोन हौद आहेत. या टाक्यावर तानाजीची मूर्ती कोरलेली आहे. खडकात आडवे कोरलेले हे टाके अतिशय सुरेख आहे. टाक्यातील पाण्याचा फारच थोडा भाग हवा व उन्हाच्या संपर्कात येत असल्याने बाष्पिभवनाचे प्रमाण कमी आहे. यामुळे तानाजी टाक्यातील पाणी बाराही महिने उपलब्ध असते. यापुढील रस्ता चिरेबंदी पायऱ्यांचा होता. परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे पायऱ्यांचा रस्ता कोसळला आहे. पुढे दगडांवर अप्रतिम कोरीव काम केलेला गोमुखी आकाराचा पूर्णपणे सुरक्षित असा विशाल दिंडी दरवाजा आपल्या स्वागतासाठी आजही सज्ज आहे. हा दिंडी दरवाजा सुधागड किल्ल्याचे महाद्वार असून तो रायगडच्या महाद्वाराची प्रतिकृती आहे.. महाद्वाराच्या दोन्ही बाजूना नख्यांमध्ये व पायाखाली हत्ती धरलेल्या शरभांची चित्रे आहेत. द्वाराच्या दोन्ही बाजूस लाकडी द्वारे उभी करण्याची मळसूत्रे, अडसर अडकविण्यासाठी छीद्रे व देवड्या कोरल्या आहेत. हा दरवाजा अशा तऱ्हेने बांधला आहे की, शत्रूकडून २ वेळा चढाई होऊन सुद्धा तो सुरक्षित राहीला आहे. यापुढे आणखी एक दरवाजा असून त्याचे बाजूस भक्कम तटबंदी आहे. येथे पूर्वी पहाऱ्याची चौकी होती. घडीव दगडांचा उपयोग करुन किल्ल्याला बुरुज व तटबंदी केली आहे. तोफा व बंदुकांचा मारा करणेसाठी तटास अनेक जंग्या (छिद्रे) ठेवल्या आहेत. किल्ल्याची बांधणी चिलखती स्वरुपाची आहे. किल्ल्यावरील महत्वाचे भागी असणारे बुरुज चिलखती बांधणीचे आहेत. काही मुख्य सामाजिक-राजकिय निर्णय याच वाड्यातून घेण्यात आले होते.

किल्ल्यावर प्राचीन काळातील श्री भोराईदेवीचे मंदिर आहे. श्री भोराई देवीची स्थापना भृगुऋषींनी केलेली आहे. म्हणून या देवीला “भृगुअंबा, भोरांबा, भोराई” अशीही नावे आहेत. पुराण काळात भृगुऋषींचा या किल्ल्यावर आश्रम होता असे सांगितले जाते. येथील निरव शांततेच त्यांनी तप:साधना केली. मात्र आपल्या उत्तर काळात ते गोमाशी गावाजवळ येवून राहिले होते. देवी स्थापनेच्या वेळी भृगुऋषींनी देवीला काही मंत्र दिले. यानुसार भक्तिभावाने शरण येणाऱ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणे, व्याधी पीडा व सर्पदंश उतरविण्याचे सामर्थ्य देवीमध्ये असल्याचे सांगण्यात येते. श्रीभोराई देवीची मूर्ती ३ फूट उंचीची आहे. मूळ चंडीकेचे स्वरुप असणारी श्रीभोराई चतुर्भुज असून तिचे हातात त्रिशूळ, खड़ग खेटक आणि दोन हातात आसूड आहे. श्री. भोराईदेवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंतसचिवांनी पुनर्बांधणी केली व याच देवीला त्यांनी आपली कुलदेवता म्हणून मानले. पंत सचिवांनी या मंदिराचे सभागृह सन १७५० मध्ये बांधून पूर्ण केले. चिकणमातीसारखे प्लॅस्टर वापरुन तक्त पोषीला सुबक कोरीवकाम केलेले होते. परंतु आता ते कालौघात नष्ट झाले आहे. सुरुचे खांबावरील सुंदर नक्षीकाम आजही लक्ष वेधून घेणारे आहे. मंदिरासमोर दगडाची उंच दीपमाळ आहे. देवळातील प्रचंड घंटा पोर्तुगीज घाटणीची आहे.

मंदिराचे परिसरात अनेक वृंदावने व समाध्या आहेत. ह्या समाध्या तपस्या करणाऱ्या साधकांच्या असाव्यात किंवा वीरमरण आलेल्या तालेवारांच्या असाव्यात. यावर सुबक नक्षीकाम केलेले आहे. सरकारवाड्यातून मंदिराकडे येणारी वाट दोन्ही बाजूंनी व्यवस्थित बांधलेली असून या मार्गावर दगडावर कोरलेली मूर्ती आहे. देवीला दिला जाणारा बळी या ठिकाणी दिला जात असावा, पंत सचिवांनी कुलस्वामीनी असलेली श्री भोराई देवी आजही गांडेकर, मुजुमदार घराण्याचे दैवत म्हणून मानण्यात येते. गुरव, खंडागळे, खोडागळे व सरनाईक ही घराणी श्री भोराई देवस्थानाशी संबंधित आहेत.

श्री भोराईदेवी ही सुधागड तालुक्याचे दैवत मानण्यात येते. म्हणून प्रत्येक सुधागडवासीय श्री भोराई देवीचे दर्शनासाठी वर्षातून एकदा तरी गडावर येत असतो. आश्विन नवरात्रात भाविकांच्या उत्साहाला उधाण येते. गडावर हजारो भाविक स्त्री-पुरुषांची गर्दी असते. पंतसचिव चिमणाजी रघुनाथ (इ.स. १८३६ ते १८७१) उर्फ नानासाहेबांनी पुत्र प्राप्तीसाठी देवीला नवस केला होता व त्यांना शंकरराव उर्फ रावसाहेब हा पुत्र झाला. तेव्हापासून १० दिवसांच्या आश्विन नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. त्याकाळात उत्सव साजरा करण्याची जबाबदारी तालुक्याचे मामलेदार यांच्यावर असे. यावेळी तालुक्यातील इतर सरकारी कार्यालये सुद्धा गडावर येत असत. मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक, दुपारी गाणे, सायंकाळी आरती, रात्री कीर्तन असा कार्यक्रम असे. अष्टमीचे दिवशी गडकऱ्यांना मानाप्रमाणे नारळ व मानाचे विडे देत असत. शतचंडी होमासाठी पुष्कळ ब्राम्हण गडावर येत असत. सनई चौघडा, संबळ, शिंगे, तुताऱ्या, ढोल, यासर्व वादकांची गडावर हजेरी असे. शिलंगणाचे दिवशी पालखी निघत असे. नवरात्राचा हा कार्यक्रम मधली काही वर्षे विस्कळीत झाला होता. परंतु पंचायत समिती सुधागडचे माजी सभापती नामदेव येसू खैरे व उपसभापती मा.मो. देशमुख यांनी तो पुन्हा सुरु केला. आजही श्री भोराई देवस्थान मंडळाचे विश्वस्त गडावर नवरात्र उत्सव पूर्वापार पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नवरात्रात हजारो भाविकांना प्रसादाचा लाभ दिला जातो. याकाळात श्रद्धावान माणसे आपले सफल झालेले नवस फेडण्यासाठी मंदिरात येत असतात. श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळ किल्ल्यावरील वाडा, मंदिर व अन्य बांधकामे यांचे जतन करण्यासाठी व किल्ल्याचे परिसराची देखभाल करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

नवरात्र काळात सुधागड किल्ला निसर्गसौंदर्याने नटलेला, सजलेला असतो. या दिवसामध्ये गडावरुन पायथ्या खालील दृश्य पाहणे फार मजेशीर व आनंददायी असते. गडाचे टोकावर उभे राहून पर्वतांच्या रांगा, वळसे घेत जाणाऱ्या नद्या, पिवळसर भातशेती पाहणे एक मौज असते. सर्वकाळ गर्द झाडीने नटलेला, थंड आणि आरोग्यवर्धक हवामान असलेला सुधागड किल्ल्याचा परिसर अनेकांना भुरळ घालणारा आहे. गिर्यारोहकांना सुद्धा हा किल्ला एक आकर्षण ठरला आहे. रायगड प्रादेशिक आराखड्यामध्ये हा किल्ला संकल्पित पर्यटन केंद्र म्हणून सुचविण्यात आला आहे. या दृष्टीकोनातून गडावर पायरस्ता व विजेची सुविधा होणे आवश्यक आहे. असे झाल्यास शहरी जीवनात त्रस्त झालेल्या लोकांना विरंगुळा म्हणून या गडावर येवून रहाणे सुखकर होणार आहे आणि सृष्टीचा विशाल जीवनदायी स्पर्श अनुभवता येणार आहे. मग संसारिक आपत्तींनी मनुष्य कितीही गांजलेला असला तरी, तो सुधागड किल्ल्यावर जावून आला तर त्याला जीवनातील अनेक समस्यांशी झुंजण्याचे सामर्थ्य निश्चित प्राप्त होणारे आहे !