महाराष्ट्रात कोरीव लेणी अनेक ठिकाणी आहेत. अजंठा-वेरुळ येथील लेणी जगप्रसिद्ध असून लाखो पर्यटक या स्थळांना भेटी देतात. पुणे जिल्ह्यातील कार्ले, भाजे येथील बौद्ध लेणी सुप्रसिद्ध आहेत. श्री एकविरा देवीचे स्थान जवळच असल्याने कार्ल्याची लेणी पर्यटकांना विशेष परिचित आहेत. रायगड जिल्ह्यात घारापूरी येथील हिंदू देव-देवतांची भव्य स्वरुपातील सुबक व कोरीव लेणी ही सुद्धा पर्यटकांचे आकर्षण बनलेली आहेत. याखेरीज रायगड जिल्ह्यात माणगांव, महाड, सुधागड या तालुक्यात बौद्ध व पांडवकालीन लेणी सुद्धा भरपूर आहेत. या दृष्टीने माणगांव तालुक्यातील कुडे-मांदाड येथील लेणी व सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथील लेणी प्रसिद्ध आहेत. कुडे-मांदाडची लेणी समुद्राचे खाडी जवळील डोंगरात आहेत. तर ठाणाळे येथील लेणी मात्र सह्याद्री डोंगर मालीकेत घनदाट अशा जंगलामध्ये सुधागड तालुका व पुणे जिल्ह्याच्या सीमारेषेत खोदणेत आली आहेत. २००० वर्षापूर्वी कोणतेही प्रगत तंत्रज्ञान नसतांना डोंगरातील एकाच सलग दगडामध्ये प्रचंड पाषाण फोडून ही लेणी तयार केली आहेत. अजुनही रस्ता नसलेल्या अशा निर्मनुष्य भागामध्ये हिंस्त्र- श्वापदांचा धोका पत्करुन तत्कालीन मानवाने खोदलेली ही लेणी पाहिली म्हणजे या माणसांच्या कलेबरोबर त्यांचे धैर्य, बळ व सुत्रबद्धता यांचे कौतुक वाटते..
पाली गावापासून ठाणाळे हे गांव १५ कि.मी. अंतरावर आहे. ठाणाळे या गावी येण्यासाठी नाडसूरपर्यंत एस्.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. नाडसूर ते ठाणाळे हे २ कि.मी. अंतर असून तेवढेच अंतर लेण्याकडे जाण्यासाठी चालावे लागते. ठाणाळे गावाच्या पूर्वेस असलेल्या ज्या जंगलामध्ये ही लेणी आहेत. त्या भागाला चिवरदांड असे म्हणतात. लेण्याकडे जाणारा मार्ग हा घनदाट जंगलातून असलेने लेणी पाहाण्यासाठी ठाणाळे गावातून माहितगार व्यक्तिला न्यावे लागते. पुणे जिल्ह्यातील तेलबैला व आंबवणे या गावाकडूनही येथे येण्यास मार्ग आहेत. ठाणाळे लेणी पाहणाऱ्या कला रसीक पर्यटकांना जंगलामध्ये प्रवेश करताच एका वेगळ्या प्रतिभा विश्वात प्रवेश केल्यासारखे वाटते. या जंगलातून प्रवास करणे म्हणजे निसर्गसौंदर्याचा मनमोहक आनंद व चित्तथरारक अनुभव घेण्यासारखे आहे. अशा या निर्जन परिसरातील लेण्यात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही आश्रय घेतला होता. वासुदेवरावांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने मोठे बक्षिस जाहीर केले होते. यावेळी इंग्रजांना चुकवित कोकणातून घाटावर येतांना वासुदेवराव येथे राहिले होते.
ठाणाळेच्या जंगलामध्ये दुर्गम कडेकपाऱ्या आहेत. दिवसा सूर्यप्रकाशाची किरणे सुद्धा काही ठिकाणी पोहचू शकत नाहीत अशी दाट वनवृक्षराजी आहे. जंगलामध्ये उंच कड्यावरुन जोरदारपणे वाहणारे ओढे आहेत. तसेच खळाळून वाहणारे निर्झरसुद्धा आहेत. प्रवासातील आपला थकवा दूर करणारे स्वच्छ व थंडगार पाणी ओढ्यामधून वाहत असते. या जंगलातून जातांना पशु-पक्षांचे आवाज, झाडांमधील वाऱ्याची सळसळ, प्रकाशाची उभी-आडवी किरणे, रंगीबेरंगी पानेफुले, वाऱ्याच्या झुळकीबरोबर येणारा सुगंधी दर्प या साऱ्याच गोष्टी आपणाला मोहून टाकतात. लेण्याची जागा जंगलामध्ये दुरुन सहजासहजी दिसत नाही. जंगलामध्ये वाघ, कोल्हे, रानडुक्कर, जंगली वानर, माकडे, तरस, भेकर, हरीण, साप, अजगर, घोरपडी असे विविध प्राणी आहेत. वानरांमधील हुप्याचा आवाज जंगलभर घुमत असतो व आपल्या आगमनाची चाहुल लागताच हा प्राणी दूर जावू लागतो.
ठाणाळे लेण्याचा काळ इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून इ.स. ५ व्या शतकापर्यंतचा आहे. ही लेणी डोंगरामध्ये पश्चिमाभिमुख कोरलेली आहेत... लेण्यात सापडलेल्या विविध वस्तू व मौर्यकालीन चांदीची नाणी पहाता ही लेणी २२०० वर्षापूर्वीची असल्याचे अनुमान काढणेत येते. लेण्याचा दगड हा अग्निजन्य (बेसॉल्ट) दगड आहे. या दगडाला छिन्नी हातोड्यांनी सम प्रमाणात खडबडीत करुन ही लेणी कोरली आहेत. आकाराने ओबडधोबड किंवा साधी वाटली तरी ही लेणी शिल्पकलेच्या दृष्टीने अप्रतिम आहेत. तसेच मानवी जीवनाच्या आर्थिक जडणघडणीत या लेण्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. ही लेणी म्हणजे समुद्र किनाऱ्यावरुन चील- धरमतर नागोठणे खाडीमार्गे देशावर जाणारी व्यापारी केंद्रे होती असे म्हटले जाते. वाघजाई घाटातून मावळात जाणारा प्राचीन मार्गही या लेण्यांजवळून जातो. यामुळे ही लेणी चील बंदराच्या सान्निध्याने खोदली गेली आहेत. कोकणातून घाटमार्गे देशावर जाता-येतांना विश्रांतीचे स्थान म्हणून ह्या लेण्यांचा उपयोग केला गेला. त्याचबरोबर बौद्ध भिक्षूंच्या भदन्त आचार्य, परिव्राजक यांच्या निवाऱ्यासाठी सुद्धा या लेण्यांचा उपयोग इ.स. ५ व्या शतकापर्यंत करण्यात आला आहे. या लेण्याच्या सहाय्याने त्यांना मनन, चिंतन, अध्ययन करणेही सोयीचे झाले असावे. सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर बौद्ध धम्म व संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून भारतात अनेक ठिकाणी चैत्यगृहे व विहारांची निर्मिती केली. त्याचा एक भाग म्हणून ठाणाळेच्या जंगलात ही लोणी खोदणेत आली असावित.
ठाणाळे लेणी समुहात चैत्यगृह, स्मारक स्तूपसमूह, सभागृह व उर्वरीत २१ विहार लेणी आहेत. बहुतांश विहारामध्ये व्हरांडे आणि एक किंवा दोन खोल्या असून त्यामध्ये शयनासाठी ओटे आहेत. काही विहार दोन किंवा तीन भिक्षूंच्या निवासासाठी खोदले आहेत. तर काही विहारामध्ये समोरच्या भागात दालन व चार पाच भिक्षूंच्या निवासाची व्यवस्था आहे. अशा विहारात आंतरदालन, प्रवेशद्वार, खिडकी व शयन ओटे आहेत. ५ पायऱ्यांचा जिना असलेल्या एका विहारात वाकाटककालिन रंगीत चित्रांचे काही अवशेष दिसतात. दुसऱ्या एका विहारातील दालन, व्हरांडा, भिक्षुगृह, नष्ट झालेले आहे. मात्र प्रवेशद्वारावरील भग्नावशेषात गजलक्ष्मी कोरलेली आहे. याच प्रवेशद्वारावर चैत्याकृती शीर्षाची कमान आहे. कमानीच्या पातळीवर एका ओळीत सहा लहान चैत्यगवाक्षे आहेत. गवाक्षांच्या खाली वेदिका अलंकरण आहे. प्राकृत ब्राम्ही लिपीतील शिलालेख असलेले एक पाण्याचे टाके येथे आहे. " (पु) छरकस, पूजावतीया अन्तवा सिपकरस दानं ओढी" या शिलालेखानुसार राजस्थानातील पुष्कर गावच्या पुजावती नामकमिक्षुणीच्या पारस नावाच्या शिष्याने या पाण्याच्या टाक्याचे दान दिलेले आहे. म्हणजे राजस्थानपासून नाशिक-सोपारा मार्गे व्यापारी दळणवळणासाठी येथे भिक्षूंची ये-जा होत असे.
मुख्य सभागृह : ठाणाळे लेण्याचे मध्यभागी १२ मीटर x १० मीटर लांबी रुंदीचे व २.७९ मीटर
उंचीचे मुख्य सभागृह असून हे लेणे शिल्प कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. सभागृहाच्या
तिन्ही आंतरभिंतीना लागून ८ खोल्या (भिक्षुगृहे) आहेत. उत्तर बाजूस एक, पाठीमागील बाजूस
चार आणि दक्षिणेकडील तीन अशा या आठ खोल्यांची रचना आहे. या खोल्यांमधून प्रवेश
करण्यासाठी तीन छोटे सोपान कोरलेले आहेत. खोल्यांना लागून ओटे आहेत व प्रत्येक खोलीन
शयन ओट्यांवर बसून समोरील सृष्टीशोभा न्याहाळता येते. सभागृहाच्या उत्तरेकडील भिंतीत
चैत्याकृति शीर्ष असलेली देवळी असून त्याला लागून भिक्षुगृहाचे प्रवेशद्वार आहे. देवळीच्या
बाजूस असलेल्या चौकोनावर प्राकृत ब्राह्मी शिलालेख कोरला आहे. यामध्ये शिवगणपुत्र गोदत्त
याची देणगी नमुद केली आहे. देवळीच्या कमानीत सुंदर नक्षीकाम केलेले आहे. या देवळीला
लागून असलेल्या भिक्षुगृहाच्या प्रवेशद्वारावर दोन चैत्य गवाक्षामध्ये शिल्पपट असून
मध्यभागी वेदीका पट्टी व स्तुपाचे उठाव शिल्प आहे. याचे दोन्ही बाजूस स्त्री-पुरुष हातात
फुले घेऊन पुजा करीत असल्याचे शिल्प कोरले आहे. येथील नक्षीदार जाळीची खिडकी पटकन
आपले लक्ष वेधून घेते.
सभागृहाच्या दक्षिणेकडील पहिल्या खोलीचेवर पंचफणी नागाचे वेटोळे आहे. या ठिकाणच्या
देवळीतील कमानीत सिंहिण व तिचा छावा दाखविला आहे. दुसऱ्या चैत्य कमानीतील
दरवाजावर दुसरे गजलक्ष्मीचे शिल्प आहे. सभागृहाच्या मध्यभागी छतावर कमळाची सुंदर
नक्षी असलेले उठाव शिल्प कोरलेले आहे. सभागृहाचे दोन्ही बाजूस पाणी साठविणेसाठी ३ मी.
खोलीचे भव्य हौद खोदले असून हौदाचा तोंडाचा भाग निमुळत्या स्वरुपात झाकणासाठी उघडा
ठेवला आहे. या पाण्याच्या टाक्यांना पूर्वी पोढी म्हणत असत. उत्तरेकडील भाग कोसळला
असल्याने पोढी नष्ट झाली आहे.
स्मारक स्तूप समुह : लेण्याचे दक्षिणेकडील भागात ८.५ मी. x ५ मी. लांबीरुंदीच्या दुसऱ्या
एका सभागृहात ८ स्मारक स्तूप आहेत. सहा स्तूप एकसंघ तर दोन देवळीतील आहेत. येथेही
दोन खोल्या व शयनांचे ओटे आहेत. यातील काही स्तूपांवर पिरॅमिड आकाराचे अलंकरण आहे
व चार कोपऱ्यात छिद्रे आहेत. त्याचा उपयोग फुलांच्या माळा खुंटीने अडकविण्यासाठी असावा.
याच सभागृहात कोरीव काम केलेल्या कोनाड्यात (देवळी) पूर्णाकृती २ स्तूप आहेत.. भिक्षूंच्या
स्मृतिप्रित्यर्थ हे स्तूप उभारण्याची प्रथा होती. ठाणाळे लेण्यामध्ये स्तंभविरहित एक चैत्यगृह
आहे. चैत्यगृहाच्या दक्षिणेकडील अंतर्भागात एक स्तूप आहे. लेण्यांच्या दक्षिणेकडील भागात
एका विशिष्ट दगडावर थाप मारल्यास मृदंगातील स्वराप्रमाणे विविध स्वर ऐकू येतात. याच
भागात लांबवर गेलेला भूयारी मार्ग आहे. लेण्यातील बहुतांश खडबडीत पृष्ठभागावर विशिष्ट
मिश्रणाच्या लगद्याला घोट्याने गुळगुळीत करुन त्याचे सहाय्याने चित्रे काढण्याची कल्पना
होती परंतु ती अपूर्ण राहीली. लेण्यातील शिलालेख व भित्तीचित्रांच्या अवशेषांचे संशोधन
करण्यात आले आहे. सन १८९० मध्ये प्रथम इंग्लीश पुरातत्वज्ञ जे. अॅबट व नंतर हेन्री
काझिन्स यांनी भेट देवून लेण्या संबंधात टिपणे तयार केली. प्रा. ग. ह. खरे यांच्या
“भोरसंस्थान ऐतिहासिक स्थल दर्शन" या पुस्तकात या लेण्यांचा उल्लेख आहे. लेण्यांचे
अभ्यासक डॉ. म.न. देशपांडे यांनीही या लेण्यासंबंधात स्वतंत्रपणे पुस्तक लिहिलेले आहे.
त्यांचे मते ही लेणी भाजे लेण्यांपेक्षा जुनी असावीत. पाचव्या शतकानंतर चौल बंदराचे महत्व
कमी होत गेले व घाटातून देशावर जाणारे मार्ग बदलल्यामुळे हा बौद्धविहार समूह ओस पडून
नंतरच्या काळात विस्मृतीत गेला असेही मत त्यांनी नोंदविले आहे.
ठाणाळे लेण्याच्या जंगलामध्ये विविध प्रकारच्या वृक्षवेली आहेत. विस्तिर्ण वृक्षांबरोबर र दाट
झुडपे सुद्धा आहेत. वृक्षामध्ये प्रामुख्याने ऐन, धावडा, सालढोल, पेय ही झाडे जास्त प्रमाणात
आढळतात. याखेरीज साग, नाण्या पांढरी ऐन, हेद, आंबा, काजळ, भेंड, वावळा, कोशीम, पळस,
कुडुक, शेमट, सावर, पारंगा, पिंपळ, अंबर, चांभेल, मोहा, अळू, चांद, धामण, आवळी, निवारा,
पायरकुड्या इ. एक ना अनेक प्रकारची वनौषधी झाडे येथे आहेत. काही झाडांपासून खाण्याचा
डिंक मिळतो तर काही झाडांवरील पोळ्यातून मध मिळते. पोटाच्या विकारासाठी निंबारा
झाडाचा रस, किडनीसाठी पळसाच्या फुलाचा उपचार, वातासाठी कोंबडमुळी तर चिंचार्डी व
डोंगरमुळी सर्व रोगांवर उपयुक्त आहे. किंबहुना येथील प्रत्येक झाड व त्याची मुळी व फुले-
पाने औषधी आहेत.
बौद्धकालीन लेण्याचा सांस्कृतिक ठेवा लाभलेल्या या वनक्षेत्राचा आज विकास होणे महत्वाचे आहे. यादृष्टीने शासनाने ठाणाळे भागातील जंगल हे संरक्षित वनक्षेत्र म्हणून राखून ठेवले आहे. येथे लेणी असल्याने या भागाचा पर्यटन केंद्र म्हणूनही विकास करण्याचे रायगड प्रादेशिक आराखड्यात सूचित करण्यात आले आहे. परंतु राखीव वनक्षेत्राबरोबर या जंगलाचा अभयारण्य म्हणून अद्यापि विकास करता येण्यासारखा आहे. विविध प्रकारचे वृक्ष लावणे, त्याचे संरक्षण करणे, जंगलामध्ये पक्षी सोडणे, कोसळणाऱ्या धबधब्याचे बाजूस बांधकाम करुन रमणीयता आणणे, कोसळणाऱ्या दरडी बांधून काढणे, छोटे बंधारे बांधणे व पर्यटकांसाठी पायवाटा तयार केल्यास हे जंगल अभयारण्याबरोबर उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून निर्माण होवू शकेल. आयुर्वेदात सांगितलेल्या अनेक वनौषधी येथे आहेत. वनौषधीसाठी संशोधनकेंद्र निर्माण झाल्यास अनेक व्याधींसाठी नवनवी औषधे मिळवता येतील. मधुमक्षी पालन करुन मध व झाडांपासून डिंक मिळवता येईल. घनदाट जंगलातील लेण्यांची देखभाल केल्यास पर्यटक जास्त प्रमाणात येवू लागतील. पर्यटकांना अभयारण्यात फिरण्याच्या आनंदाबरोबर प्राचीन लेणी पाहण्याची संधी मिळू शकेल. अन्यथा कोणतेच प्रयत्न झाले नाहीत तर काळाच्या उदरात हा सांस्कृतिक व नैसर्गिक ठेवा लुप्त होण्यास वेळ लागणार नाही.